निर्णयाची किंमत

काही निर्णयांत बरोबर आणि चूक हा प्रश्नच नसतो. प्रश्न असतो, आपल्याला कोणत्या प्रकारचं आयुष्य जगायचं आहे.

समीर अशाच एका निर्णयासमोर उभा होता.

चार वर्षांपूर्वी प्रेमात पडणं ही त्याची आखलेली योजना नव्हती. प्रेम कधी योजून होत नाही, ते अचानक होतं, जात, आर्थिक परिस्थिती, घराणं, गावातली प्रतिष्ठा या सगळ्या गणितांच्या पलीकडे जाऊन दोन माणसं एकमेकांना आपली वाटू लागतात. पण दोन माणसांचं नातं त्यांच्यापुरतं राहत नाही, जेव्हा त्याला लग्नाचं रूप द्यायची वेळ येते. दोन वर्षांपूर्वी समीर आणि तिने ठरवलं, आता पुढे जायचं. आणि तिथून त्यांचं प्रेम संपलं नाही, पण त्यांची परीक्षा सुरू झाली.

घरी सांगितल्यावर विरोध झाला. हा विरोध फक्त जातीचा नव्हता. त्यामागे गावातली मानसिकता होती, नातेवाईकांची मतं होती, “लोक काय म्हणतील” हा प्रश्न होता, घराण्याच्या प्रतिष्ठेची भीती होती, आणि पिढ्यानपिढ्या स्वीकारलेल्या काही गोष्टी होत्या, ज्यांना कुणी कधी प्रश्नच विचारला नव्हता. “जात” हा शब्द उच्चारायला छोटा आहे. पण एखाद्याच्या आयुष्याचा निर्णय घेताना तो किती मोठा अडथळा बनतो, हे त्यातून जाणाऱ्या माणसालाच कळतं.

आतापर्यंत जे त्याला आपले जवळचे वाटायचे, कोणीच त्याला त्याच्यासोबत असल्यासारखं वाटलं नाही. कुणाचाच त्याला आधार वाटला नाही. नेहमीप्रमाणे आताही तो एकटा होता, कदाचित आधीपेक्षा अजूनच जास्त.

समीरचे आई-वडील वाईट माणसं नव्हती. ते त्याचे शत्रूही नव्हते. उलट, त्याच्यावर प्रेम करणारीच माणसं होती. पण त्यांचं प्रेम भीतीने वेढलं गेलं होतं. समाजाची भीती, नातेवाईक काय म्हणतील याची भीती, आपल्या मुलाच्या निर्णयामुळे आयुष्यभर काहीतरी ऐकावं लागेल याची भीती. आणि भीती खूप मोठी होते, तेव्हा ती कधीकधी प्रेमाच्याच भाषेत सगळ्यात कठोर शब्द बोलते.

“तू हे केलंस तर आम्ही जीव देऊ.”

हे शब्द ऐकणं समीरसाठी सोपं नव्हतं. त्याला वाटलं, त्याच्या छातीत कुणीतरी हात घालून काहीतरी पिळून काढलंय. त्याला माहीत होतं की त्याच्या आईवडिलांचं दुःख खोटं नाही, त्यांची भीतीही खोटी नाही. पण त्याच वेळी त्याचं स्वतःचं दुःखही खोटं नव्हतं.

दुसऱ्या बाजूला ती होती. दोन वर्षं वाट पाहणारी. समीरची परिस्थिती समजून घेणारी, घरच्यांचा विरोध असूनही निर्णय घ्यायचा दबाव न टाकणारी. पण वाट पाहण्यालाही मर्यादा असते, कारण आयुष्याचा निर्णय अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येत नाही. तिच्यासाठीही हा आता फक्त प्रेमाचा प्रश्न राहिला नव्हता. तिचं वय, तिच्या घरच्यांची चिंता, तिच्या भविष्याची अनिश्चितता, हे सगळं त्यात मिसळलं होतं.

एका बाजूला त्याचे आईवडील. दुसऱ्या बाजूला त्याच्यावर विश्वास ठेवून दोन वर्षं थांबलेली व्यक्ती. आणि या दोघांच्या मध्ये त्याचं स्वतःचं आयुष्य होतं.

अशा वेळी समाजाकडून एक सल्ला सहज मिळतो: “सोडून दे तिला, घरच्यांना दुखवू नकोस.” हा सल्ला ऐकायला सोपा आहे. पण प्रामाणिक नाही. समीरला एक प्रश्न पडत होता, ज्याला माझ्या निर्णयाचे परिणाम भोगायचे नाहीत, त्याने माझ्यासाठी तो निर्णय का घ्यावा? आजची नाराजी उद्या विरून जाईल, आजची चर्चा उद्या विसरली जाईल, आणि जे आज म्हणतील “समीरने चूक केली”, ते उद्या आपापल्या आयुष्यात व्यस्त होतील. पण जो निर्णय समीर घेणार होता, तो त्याच्यासोबत राहणार होता, त्याच्या रोजच्या दिवसांत, त्याच्या शांत रात्रींमध्ये, त्याच्या उरलेल्या आयुष्यात. मग “सगळे खूश राहतील” हा एवढ्या मोठ्या निर्णयाचा पुरेसा आधार असू शकतो का?

तो स्वतःला प्रामाणिकपणे विचारत होता: मी तिला सोडलं, तर खरंच तिला सोडणार आहे, की फक्त लोकांच्या भीतीला शरण जाणार आहे? कारण नातं संपवणं आणि भीतीपोटी नातं सोडणं यात फरक असतो. पहिल्या निर्णयाची वेदना काही काळाने कमी होते. दुसऱ्यात एक प्रश्न कायम उरतो: जर मी घाबरलो नसतो, तर माझं आयुष्य कसं असतं? काही पश्चात्तापांना उत्तर नसतं.

आणि तरीही त्याला हेही माहीत होतं की घरच्यांचं दुःख दुर्लक्षित करून चालणार नाही. आईवडील म्हातारे होत होते, त्यांची मानसिकता एका दिवसात बदलणार नव्हती, त्यांना हे स्वीकारायला वेळ लागणार होता. त्यांचं दुःख समजून घेणं, त्यांच्याशी संवाद ठेवणं, त्यांच्या भीतीमागची कारणं जाणून घेणं, हे सगळं समीरला करायचं होतं. पण संवाद आणि आत्मसमर्पण यात फरक असतो हेही त्याला उमगत होतं. पालकांचा आदर करणं आणि स्वतःच्या आयुष्याचा अधिकार सोडून देणं, या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

समीरसमोर शेवटी प्रश्न इतकाच नव्हता की त्याने कोणाला निवडावं. प्रश्न होता, त्याने स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घ्यायचा, की इतरांच्या भीतीवर सोपवायचा. आयुष्य एकदाच मिळतं, आणि त्याची जबाबदारीही शेवटी आपलीच असते. निर्णय घेणारे अनेक असतात, सल्ले देणारे त्याहून अधिक. पण त्या निर्णयासोबत उरलेलं आयुष्य जगणारा माणूस एकच असतो.

समीर.

म्हणून कदाचित खरा प्रश्न “लोक काय म्हणतील” हा नव्हताच. खरा प्रश्न होता: उद्या मी स्वतःला काय सांगणार आहे? ज्यावेळी स्वतःला प्रामाणिक उत्तर द्यायची वेळ येईल तेव्हा मी ते देऊ शकेल का, की फक्त लोक काय बोलतील या भीतीने मी तिला सोडलं?

Leave a Comment

Scroll to Top