प्रेयसी(संदिपला) :- मला माफ कर, मी नाही येऊ शकत तुझ्यासोबत माझ्या घरच्यांना सोडून. एक नातं जोडण्यासाठी मी शंभर नाती नाही तोडू शकत. I am really sorry..
(‘ती’ रडत-रडत तिथून निघून जाते, संदिप होता तसाच उभा असतो.. थोड्या वेळाने तोही चिडून निघून जातो.)
.
.
संदिप (त्याच्या मित्रांना) :- हिने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही. माझ्या आयुष्यासोबत खेळली ही. मुली अशाच असतात..
एकजण :- काय रे, जर तुझ्या बहिणीचं कुणावर प्रेम असलं नि तिने त्याच्यासोबत पळून जाण्याचं ठरवलं तर काय करशील?
संदिप :- तंगडं तोडून हातात देईन तिचं. आम्हाला काही इज्जत आहे की नाही? लोक नाव ठेवतील ना आम्हाला. मान वर करून चालण्याची हिंमत नाही उरणार आमच्यात. तिला मारून टाकीन.
तो मित्र :- समजलं? तुझ्या प्रेयसीने असं का केलं ते?
संदिप :- म्हणजे? मला नाही समजलं..
मित्र :- स्वतःच्या बहिणींकरिता वेगळे विचार वेगळे नियम, आणि जिच्यावर प्रेम आहे ,जीसुद्धा कुणाचीतरी बहीण असते, तिच्यासाठी वेगळे ! का बरं रे? सगळं तुमच्या मनासारखं, तुम्हाला त्रास होणार नाही असंच झालं पाहिजे का?
मुली फक्त श्रीमंतांच्याच, पैसेवाल्यांच्याच मागे लागतात, असं म्हणतात. आणि मग आपल्या बहिणीचे लग्न एखाद्या गरीब मुलासोबत का नाही करत रे? तिथे तर नाक मुरडतात… तिथे पहिले विचारतात – जमीन, नोकरी, शिक्षण, पगार. बरोबर ना? विचार कर.