शिवा:- मी जेव्हा अस्वस्थ व्हायचो, मला कसली भीती वाटायची, दुःखी व्हायचो ना तेव्हा मी तोंड पाडून बसलेला असायचो. कारण मला वाटायचं कोणीतरी म्हणजे आई बाबा, माझे मित्र, बहिण भाऊ किंवा ज्यांना मी जवळचं मानतो ते मला येऊन विचारतील कि ‘काय झालं, उदास दिसतोय?’ आणि मग मी सगळं त्यांना सांगून टाकीन. मोकळा होईन. पण…
समीर:- पण काय?
शिवा:- असं होत नाही, कोणीच येऊन विचारीत नाही. आणि त्याचं कारण कळालंय मला..
समीर:- काय कारण आहे?
शिवा:- प्रत्येकाच्या आयुष्यात ज्याचे त्याचे सुखदुःख असतात. ते स्वतः काहीतरी कमी आहे म्हणून दररोज अस्वस्थ असतात. काळजीत असतात. आतून तेच पार खंगलेले असतात ते लोक कशाला कुणाची चौकशी करतील रे, का कुणाला भावनिक, मानसिक आधार देतील? आणि हेच आपलंही होतं. त्यामुळे कुणालाही दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये.
जोपर्यंत माणूस स्वतःच्याच आयुष्यात मश्गुल असतो, त्याच्याच अडचणींत अडकलेला असतो ना, तोवर त्याला इतरांचं दुःख दिसत नाही. लोकांना त्यांचंच सांभाळता येईना आपल्याला येऊन काय विचारणार? तसंच आपलंही आहे हं.. आपणही आपल्याच आयुष्यात आहोत, म्हणून आपल्यालाही कोणीच दिसत नाही. जवळचे फक्त म्हणायला उरतात. म्हणून आपण आपल्या आयुष्यात नीट, मजेत राहायचं, हसतखेळत जगायचं. निदान आपणतरी इतरांना समजून घेऊ, जरी आपल्याला नाही कोणी समजून घेतलं तरी…