अनेक घरांत एक संवाद वेगवेगळ्या रूपांत ऐकू येतो. मुलगा किंवा मुलगी काहीतरी वेगळं ठरवते: वेगळं क्षेत्र, वेगळं शहर, वेगळा जोडीदार. घरात शांतता पसरते, आणि मग आईवडिलांकडून एक वाक्य येतं: “आम्ही तुझ्यासाठी काय कमी केलं?”
त्या वाक्यात खोटं काहीच नसतं. आईवडिलांनी खरोखर रात्री जागवल्या असतात, स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवल्या असतात, आणि मुलांना पायावर उभं करण्यात आयुष्य घालवलेलं असतं. म्हणूनच हा विषय अवघड आहे. इथे कोणी खलनायक नाही. दोन्ही बाजू खऱ्या आहेत, आणि तरी दोघांच्या मध्ये एक दरी आहे.
आईवडिलांच्या रागामागे बहुतेक वेळा प्रेमच असतं, पण ते भीतीत मिसळलेलं. “पोरगं चुकीच्या वाटेला गेलं तर?” ही भीती. आणि त्याच्या शेजारी उभा असतो समाज: “लोक काय म्हणतील?” आपल्या समाजात मुलांचं यश किंवा अपयश हे पालकांचं प्रमाणपत्र मानलं जातं. मूल वेगळ्या वाटेने गेलं की पालकांना वाटतं, आपली वर्षानुवर्षांची मेहनत, आपली प्रतिष्ठा, सगळंच पणाला लागलं.
पारंपरिक समाजात मुलं ही पालकांच्या वृद्धापकाळाची मोठी सुरक्षितता होती. मुलं शेतात राबायची, कमवायची आणि म्हातारपणी आई-वडिलांना सांभाळायची. पेन्शन नव्हतं, विमा नव्हता, म्हणून मुलं हीच म्हातारपणाची सोय होती. त्यामुळे मुलांनी पालकांचं ऐकणं हा केवळ संस्कार नव्हता; तो त्या काळच्या कौटुंबिक व्यवस्थेचा एक भाग होता. आता जग बदललं आहे, पण मनातले जुने करार तसेच राहिले आहेत.
पिढ्या बदलतात, कारण बदलणं हाच नियम आहे
मुलांनी नेहमी पालकांचंच ऐकलं असतं, तर काय झालं असतं? सगळ्या पिढ्या सारख्याच राहिल्या असत्या. कोणी गाव सोडलं नसतं, कोणी नवी गोष्ट शिकली नसती, कोणी रूढ कल्पनांना प्रश्न विचारले नसते.
आपल्या मातीतलं सगळ्यात ठळक उदाहरण सावित्रीबाई आणि जोतिराव फुले यांचं आहे. १८४८ मध्ये त्यांनी पुण्यात मुलींची शाळा काढली. तेव्हा मुलीने शिकणं म्हणजे समाजाच्या नजरेत मर्यादा ओलांडणं होतं. समाजाच्या दबावाखाली जोतिरावांच्या वडिलांनी त्यांना घर सोडायला सांगितलं. आज आपण हा संघर्ष अभिमानाने आठवतो, पण त्या क्षणी तो एका कुटुंबातला कलह होता, वडील आणि मुलामधला मतभेद. आज आपल्या मुलींना शिकवण्यात कोणालाच वावगं वाटत नाही, ते अशाच “न पटणाऱ्या” निर्णयांमुळे.
मानववंशशास्त्रज्ञ (Anthropologist) मार्गारेट मीड यांनी समाज तीन प्रकारचे असतात असं म्हटलं आहे. पहिल्या प्रकारात मुलं पूर्वजांकडून शिकतात. दुसऱ्यात ती समवयस्कांकडून शिकतात. तिसऱ्या प्रकारात, जिथे बदल इतका वेगवान असतो, तिथे मोठ्यांनाही मुलांकडून शिकावं लागतं. आजची पिढी अशाच काळात जगते आहे. आई-वडिलांचा अनुभव अमूल्य आहे. पण मुलांसमोरची अनेक क्षेत्रं, तंत्रज्ञान, कामाच्या पद्धती, नात्यांची रूपं आणि सामाजिक आव्हानं त्यांच्या पालकांच्या अनुभवापेक्षा वेगळी आहेत. त्यामुळे जुन्या पिढीचे विचार जसेच्या तसे पुढे नेता येत नाहीत.
तारुण्यातला सर्वात मोठा प्रश्न असतो “मी कोण आहे?” स्वतःची ओळख निर्माण करणं हे तारुण्याचं मूलभूत काम आहे. आणि ही ओळख स्वतःचे निर्णय घेऊनच तयार होते. तरुणपण हा काळ प्रयोगांचा, चुका करण्याचा आणि आपला मार्ग शोधण्याचा असतो. निर्णयाचं स्वातंत्र्य हे बंडखोरीचं लक्षण नाही, ती विकासाची गरज आहे.
“तू आमचं ऐकलंस तरच आमचं प्रेम” असं वातावरण (conditional) असेल, तर मुलांमध्ये नाराजी आणि अपराधगंड वाढतो असं अभ्यासांत दिसलं आहे. अनेक मुलं मग आईवडिलांशी खोटं बोलू लागतात, गोष्टी लपवू लागतात, किंवा स्वतःच्या इच्छा मारून जगतात. त्यातून नातं जवळ येत नाही, ते फक्त औपचारिक उरतं.
पूर्वी लग्न ही केवळ दोन व्यक्तींची गोष्ट नव्हती. ती कुटुंब, जात, समाज, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक प्रतिष्ठेशी जोडलेली होती. मुलामुलींची भेट कमी व्हायची. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबावर अवलंबून असायच्या. लग्न टिकवणं हे अनेकदा वैयक्तिक आनंदापेक्षा महत्त्वाचं मानलं जायचं. आज परिस्थिती बदलली आहे. मुलं-मुली एकत्र शिकतात, काम करतात, स्वतः कमावतात आणि अनेकदा लग्न उशिरा करतात. स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर “माझं आयुष्य कसं असावं?” हा प्रश्न स्वाभाविकपणे “माझ्यासोबत कोण असावं?” या प्रश्नापर्यंत पोहोचतो. आज लग्नाकडे केवळ कर्तव्य म्हणून नव्हे, तर मैत्री, परस्पर आदर, समजूतदारपणा आणि आयुष्यभराच्या सोबतीच्या नात्याप्रमाणे पाहिलं जातं. म्हणून मुलांना वाटतं की, ज्या निर्णयाचे परिणाम त्यांना आयुष्यभर जगायचे आहेत, तो निर्णय घेण्यात त्यांचाही निर्णायक वाटा असायला हवा.
प्रेमविवाह असो किंवा ठरवून केलेलं लग्न—नातं टिकवणारी गोष्ट शेवटी दोन व्यक्तींमधला परस्पर आदर, संवाद आणि जबाबदारी असते. आणि त्याला कुटुंबाचा आशीर्वाद मिळाला, तर त्या नात्याचा प्रवास अधिक आधाराचा होऊ शकतो.
प्रेम कि कर्ज?
पालकत्व हा पालकांचा स्वतःचा निर्णय असतो. आणि तो प्रेमाचा निर्णय असेल, तर प्रेमाचं दान परत मागता येत नाही. जेव्हा त्याग बिलाच्या भाषेत बोलू लागतो (“इतकं केलं, आता ऐक”), तेव्हा दान कर्ज बनतं आणि नात्यात हिशेबाची भाषा येते.
पण दुसरी बाजूही तितकीच खरी. कृतज्ञता म्हणजे आज्ञापालन नाही, हे खरं; पण याचा अर्थ नुसतं दुर्लक्ष करणंही नाही. मुलांनीही स्वतःच्या निर्णयांची जबाबदारी घ्यावी लागते. निर्णय घोषित करणं आणि निर्णय समजावून सांगणं यात फरक आहे. आईवडिलांचा आदर करणं आणि त्यांच्याशी सहमत असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आणि पुढे जाताना त्यांची काळजी घेणं, हे नात्याचं एक कायमचं कर्तव्यच असतं.
मार्ग काय?
पालकांनी भीती आणि आदेश यात फरक करावा. “मला काळजी वाटते” आणि “तू असंच केलं पाहिजे” ही दोन वेगळी वाक्यं आहेत. मुलांना प्रश्न विचारा, मग सल्ला द्या. आणि त्यांचा निर्णय चुकला तरी त्यांना पडायचा आणि उठायचा हक्क द्या.
मुलांनीही आधी ऐका, मग बोला. आपला निर्णय तयारीनिशी मांडा: कारणं, योजना, आणि जोखीम. आईवडिलांच्या भीतीची खिल्ली उडवू नका, त्यामागे प्रेम असतं.
एका पिढीची सुरक्षितता दुसरीला बंधन वाटू शकते, आणि एकीचं स्वातंत्र्य दुसरीला बेपर्वाई.
रोपटं उभं राहताना त्याला काठीचा आधार लागतो. पण तेच रोपटं मोठं झाल्यावरही ती काठी घट्ट बांधून ठेवली, तर आधार देणारी काठीच त्याच्या वाढीला अडथळा ठरू शकते.
आई-वडीलही असेच असतात—मुलांना उभं राहायला, दिशा शोधायला आणि आयुष्याला सामोरं जायला आधार देणारी माणसं. पण त्यांच्या पालकत्वाचं खरं यश मुलांना कायम आपल्या सावलीत ठेवण्यात नसतं. खरं यश तेव्हा असतं, जेव्हा मुलं स्वतःच्या मुळांवर भक्कमपणे उभी राहतात आणि पालकांना त्यांची उंची पाहताना भीतीपेक्षा अभिमान वाटतो.
आणि मुलांनीही हे कधी विसरू नये— आज आपण ज्या बळावर स्वतःच्या पायावर उभे आहोत, त्याची सुरुवात कधीतरी याच काठीच्या आधाराने झाली होती. काठीचा आधार मागे पडतो, पण त्या आधाराची जाणीव कधीच मागे पडू नये.