एक भाषण जे कधी दिलंच गेलं नाही

१९३६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक भाषण लिहिलं — Annihilation of Caste. लाहोरच्या एका सुधारक संघटनेने (जात पात तोडक मंडळ) त्यांना अध्यक्षपदासाठी बोलावलं होतं. पण भाषण आधी वाचल्यावर त्यांनी निमंत्रण मागे घेतलं. ते भाषण प्रत्यक्षात कधी दिलंच गेलं नाही.

कारण त्यात जे लिहिलं होतं, ते ऐकायची तयारी कोणाची नव्हती.

हे भाषण आज जवळपास नव्वद वर्षांनंतरही तितकंच प्रस्तुत आहे. आंबेडकरांनी जे प्रश्न विचारले होते — समाज, जात, धर्म, राजकारण, माणसाची प्रतिष्ठा — ते अजून तसेच आहेत.

हा ब्लॉग त्याच भाषणाचा गाभा आहे — त्यांच्याच विचारांच्या क्रमाने, सोप्या शब्दांत. चला सुरुवात करू…

—

आधी राजकारण, मग समाज — हे खरं आहे का?

एक सामान्य युक्तिवाद असतो — राजकीय सुधारणांपूर्वी सामाजिक सुधारणा होणे आवश्यक नाही. आधी राजकीय स्वातंत्र्य मिळवू, मग समाज सुधारू. आंबेडकर हे मान्य करत नाहीत.

ते म्हणतात — राज्यघटना, कायदे, निवडणुका — या सगळ्या गोष्टी समाजाच्या वास्तवावर उभ्या असतात. जर समाजातच विषमता खोलवर रुजलेली असेल, तर कायद्याने ती नष्ट होत नाही. कायदा कागदावर असतो, जात माणसाच्या मनात असते.

शिवाय — भारतात सत्तेचा खरा स्रोत कोणता आहे? न्यायालय की मंदिर? न्यायाधीश की पुजारी?

आंबेडकर सांगतात — इथे सामान्य माणसावर न्यायाधीशापेक्षा पुजाऱ्याचा प्रभाव जास्त असतो. संप असो, निवडणूक असो — सगळ्याला धार्मिक वळण सहज दिलं जाऊ शकतं. आणि दिलंही जातं.

म्हणजे धर्म हा केवळ श्रद्धेचा विषय नाही — तो सत्तेचा स्रोत आहे.

जर सत्ता धर्मातून येते, आणि धर्म जातीला पवित्र ठरवतो, तर राजकीय सुधारणा एकट्याने पुरेशी नाही.

आंबेडकर विचारतात — स्वातंत्र्य म्हणजे काय? एका माणसाने दुसऱ्यावर गाजवलेलं वर्चस्व नष्ट करणं. हे वर्चस्व केवळ आर्थिक नाही. ते सामाजिक आहे, धार्मिक आहे, मानसिक आहे.

लोकांना जोपर्यंत हे माहित नसेल की बदलानंतर त्यांना जात आणि धर्माच्या आधारावर वेगळं वागवलं जाणार नाही — तोपर्यंत ते कुठल्याही सामूहिक बदलात सहभागी होणार नाहीत. हे आंबेडकरांचं निरीक्षण आजही तितकंच खरं आहे.

जात म्हणजे नक्की काय?

जातीबद्दल बोलताना एक गोष्ट नेहमी सांगितली जाते — “जात म्हणजे काम वाटून घेणं. समाज व्यवस्थित चालावा म्हणून केलेली रचना.”

आंबेडकर हे ऐकतात आणि थेट विचारतात — कुणाच्या सोयीसाठी?

जातीव्यवस्था ही फक्त श्रमाची विभागणी नाही — ती श्रमिकांचीही विभागणी आहे. ती श्रमिकांना दर्जानुसार एकमेकांच्या वर विभागणारी एक उतरंड आहे.

फरक समजून घ्या. काम वाटणं म्हणजे — कुणी शेती करेल, कुणी व्यापार करेल, कुणी शिकवेल. हे ठीक आहे. पण जातीव्यवस्था इथे थांबत नाही. ती माणसांना दर्जानुसार एकमेकांच्या वर लावते. एक उतरंड बनवते — आणि त्या उतरंडीत जन्माने जागा ठरते, कर्तृत्वाने नाही.म्हणजे एखाद्याला त्याच्या जातीचा नसलेला व्यवसाय करायचा असेल — तर त्याला समाज सोडणार नाही. तो भुकेला राहिला तरी. त्याला रुची नसलेलं काम आयुष्यभर करावं लागेल — कारण त्याचा जन्म तसा झाला.

म्हणजे एखाद्याला त्याच्या जातीचा नसलेला व्यवसाय करायचा असेल — तर त्याला समाज सोडणार नाही. तो भुकेला राहिला तरी. त्याला रुची नसलेलं काम आयुष्यभर करावं लागेल — कारण त्याचा जन्म तसा झाला.

वैयक्तिक भावनेला, वैयक्तिक क्षमतेला इथे जागा नाही. ही व्यवस्था दैवावर चालते — माणसावर नाही.

काहींनी जातीव्यवस्थेचं समर्थन करताना वेगळाच युक्तिवाद केला — जात म्हणजे वंशाची शुद्धता जपणं. रक्त शुद्ध राहावं म्हणून जात असते.

आंबेडकर हे शांतपणे, पण नेमकेपणाने खोडतात.

वंशशास्त्र सांगतं — शुद्ध वंश कुठेही अस्तित्वात नाही. जगाच्या प्रत्येक कोपऱ्यात वेगवेगळ्या वंशांची सरमिसळ झालेली आहे. भारतातही. आणि महत्त्वाचं म्हणजे — जातीव्यवस्था भारतात ही सरमिसळ झाल्यानंतर बऱ्याच काळाने आली. म्हणजे जात वंश वेगळा ठेवायला आली नाही — ती आधीच मिसळलेल्या समाजात आली.

शिवाय — जर जात म्हणजे वंश असेल, तर एकाच जातीतल्या उपजाती कशा? त्यांच्यातला फरक वंशाचा कसा असेल?

जातींना कुठलाही शास्त्रीय आधार नाही. ती एक सामाजिक रचना आहे — विज्ञानाने नाही, तर सत्तेने बनवलेली.

जर जातीला जीवशास्त्रीय आधार नाही, तर ती एवढी मजबूत का आहे? कारण ती माणसांच्या मनात आहे. श्रद्धेत आहे. धर्मात आहे.

हिंदू समाज अस्तित्वात आहे का?

“हिंदू समाज” हा शब्द आपण सहज वापरतो. पण आंबेडकर एक साधा प्रश्न विचारतात — हा समाज खरंच अस्तित्वात आहे का?

आंबेडकर सांगतात — “हिंदू” हा मुळात परकीय शब्द आहे. आणि “हिंदू समाज” म्हणजे एकसंघ असं काही नाही — ती केवळ जातींची गोळाबेरीज आहे.

प्रत्येक जात स्वतःच्या अस्तित्वाची काळजी करते. एका जातीला दुसऱ्या जातीशी जोडलेलं असल्याची भावना नसते. एका हिंदूला दुसऱ्या हिंदूशी समानतेने जोडणारं काहीच नाही. प्रत्येक माणसाच्या मनात जी जाणीव असते — ती जातीची जाणीव असते, समाजाची नाही.

समाज कशाने बनतो? संपर्काने, संवादाने, सामाईक अनुभवाने. केवळ एकाच वेळी एकाच गोष्टी करणं म्हणजे समाज नाही.

हिंदूंमध्ये वेगवेगळ्या जातींचे सण कदाचित सारखे असतील — पण ते एकसंघ नाहीत. दिवाळी एकत्र साजरी होते, पण एकाच पंगतीत बसणं होत नाही. मंदिर एकच असेल, पण आत जाण्याचा अधिकार सगळ्यांना नसतो.

ही समाजविरोधी वृत्ती केवळ जातींपुरती नाही — ती उपजातींमध्येही घुसलेली आहे. आणि तिथे ती आणखी विषारी बनते.

जाती जोपर्यंत आहेत, तोपर्यंत हिंदूंमध्ये खरं संघटन शक्य नाही. एका हिंदूला मानवतेची कर्तव्यं शिकवता येतात — पण जात जपण्याच्या कर्तव्यावर कुठलीही कर्तव्यभावना मात करू शकत नाही.

धर्मांतर करून बाहेरच्यांना हिंदू बनवता येत नाही — कारण त्यांना कुठल्या जातीत बसवणार? जातीचं सदस्यत्व जन्माने ठरतं, निवडीने नाही. त्यामुळे हिंदू धर्माला विस्तार करता येत नाही — जात त्याला रोखते.

माणूस सामाजिक प्राणी आहे, लोकांशिवाय तो राहू शकत नाही. म्हणून अनुकूल नसेल, पूर्णपणे शरण जाण्याची वेळ आली तरीही तो समाजाचा स्वीकार करायला तयार असतो. तेव्हा तो झुकतो. जात मोडली तर त्या व्यक्ती वा कुटुंबावर बहिष्कार टाकण्याचा अधिकार जातीकडे असतोच. बहिष्कार म्हणजे एकटेपणा. हे एकटेपण असह्य असतं. याच असहाय्यतेचा फायदा घेण्यासाठी जात तयारच असते.जात माणसाला आतून कसं तोडते?

जात माणसाला आतून कसं तोडते?

आतापर्यंत आपण जातीची बाहेरची रचना बघितली — समाज, संघटन, सत्ता. पण आंबेडकर इथे थांबत नाहीत. ते एक खोल प्रश्न विचारतात — जात माणसाच्या आतमध्ये काय करते?

एक माणूस चांगला असतो — पण कुणासाठी?

आंबेडकर सांगतात — हिंदूच्या नैतिकतेवर जातीने केलेला परिणाम निव्वळ दुखद आहे. त्याची सहानुभूती, त्याचं दान, त्याचं कौतुक — हे सगळं जातीच्या आत अडकलेलं असतं. गरजू माणूस दुसऱ्या जातीचा असेल तर सहानुभूती नाही. गुणी माणूस दुसऱ्या जातीचा असेल तर कौतुक नाही. गरीब माणूस दुसऱ्या जातीचा असेल तर दान नाही.

भाग्य जातीत अडकलेलं, नैतिकता जातीने बांधलेली.

जात केवळ सहानुभूती मर्यादित करत नाही — ती माणसाचं स्वातंत्र्यही संपवते. सुधारणा कशी घडते? एक माणूस समूहाच्या विरोधात उभा राहतो. म्हणतो — हे चुकीचं आहे. हे बदलायला हवं. पण जातीत हे शक्य नाही. जातीचा नियम मोडला तर बहिष्कार. माणूस सामाजिक प्राणी आहे — तो एकट्याने जगू शकत नाही. म्हणून तो झुकतो. स्वतःला मुडपतो.

जातीव्यवस्था ही उच्च-नीच अशी श्रेणीबद्ध व्यवस्था आहे. प्रत्येकाच्या वर कुणीतरी असतं, आणि प्रत्येकाच्या खाली कुणीतरी असतं. ज्याच्यावर अन्याय होतो, तोही खालच्यावर सत्ता गाजवू शकतो. त्याला एक छोटीशी प्रतिष्ठा मिळते. आणि म्हणून तो संपूर्ण व्यवस्थेला विरोध करत नाही — कारण त्या व्यवस्थेत त्याचाही थोडा फायदा आहे. हे जातीव्यवस्थेचं सगळ्यात चतुर जाळं आहे.

आंबेडकर एक नेमका फरक सांगतात — तत्व आणि नियम यात फरक आहे. तत्वानुसार केलेलं काम जाणीवपूर्वक असतं, जबाबदार असतं. नियम यांत्रिक असतात — का करायचं हे माहित नसतं, पण करायचं असतं.

हिंदू धर्म तत्वांचा धर्म राहिला नाही — तो नियमांचा धर्म बनला. काय खायचं, कुणाशी लग्न करायचं, कुणाला स्पर्श करायचा, कुणाशी बसायचं — सगळे नियम. त्यामागचं कारण विचारायचं नाही. प्रश्न विचारणं हेच पाप. आणि माणूस जेव्हा प्रश्न विचारणं सोडतो — तेव्हा तो आतून मोकळा राहत नाही.

उपाय काय?

इथपर्यंत आंबेडकरांनी एक चित्र उभं केलं — जात कशी बनली, ती कशावर उभी आहे, ती माणसाला बाहेरून आणि आतून कशी जखडते. आता प्रश्न उरतो — सुटका कशी?

आंबेडकर म्हणतात — माझा आदर्श समाज स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व यांवर आधारलेला आहे.

माणसाची ताकद कशावर अवलंबून असते? जन्म, शिक्षण, घराण्याचा वारसा, व्यावसायिक संपर्क, संपत्ती — या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे अनुकूल असतात, तो स्पर्धेत पुढे जातो. पण म्हणूनच — जर खऱ्या अर्थाने समान संधी हवी असेल, तर स्पर्धेच्या सुरुवातीला सगळे समान पातळीवर असणं आवश्यक आहे. शिक्षण सर्वांना मिळायला हवं. संरक्षणाची साधनं सर्वांकडे असायला हवीत. हे केवळ दयाळूपणाचं नाही — हे न्यायाचं आहे.

जातीव्यवस्थेत सुधारणा कुठून सुरू करायची? काही म्हणतात — आधी उपजाती नष्ट करा. आंबेडकर सांगतात — हे केलं तर जाती एकजूट होऊन अजून बळकट होतील आणि त्या अजून घटक बनतील. म्हणून खरा उपाय आहे — आंतरजातीय विवाह. रक्ताचं मिश्रण हाच एकमेव उपाय आहे जो माणसांमध्ये खऱ्या नात्याची जाणीव निर्माण करू शकतो.

जात ही काही भौतिक वस्तू नाही जी तोडता येईल. ती एक कल्पना आहे. मनाची स्थिती आहे. म्हणून जातीचं निर्मूलन म्हणजे दिसणारा (भिंतीसारखा) अडथळा तोडणं नाही — ते मानसिक बदल आहे.

इथेच आंबेडकर सगळ्यात कठीण गोष्ट सांगतात. लोक जात पाळतात कारण त्यांना तसं सांगितलं जातं — धर्माने, शास्त्रांनी. जोपर्यंत शास्त्रांना डोळे बंद करून पवित्र मानलं जातं, तोपर्यंत त्यातले नियम पवित्र राहतात. आणि जोपर्यंत नियम पवित्र राहतात, तोपर्यंत जात पवित्र राहते.

म्हणून आंबेडकर स्पष्ट सांगतात — शास्त्रांचा आणि वेदांचा अधिकार नष्ट करायला हवा. जो धर्म प्रश्न विचारायला मनाई करतो, तो धर्म माणसाला मुक्त करत नाही — तो त्याला जखडतो.

—

नव्वद वर्षांनंतर आपण ते वाचतो.  किती बदललं?

कायदे बदलले. घटना आली. आरक्षण आलं. पण जात माणसाच्या मनातून गेली का? लग्नाच्या जाहिरातींमध्ये जात आहे. निवडणुकांमध्ये जात आहे. न्यायाच्या ठिकाणीही जात आहे.

आंबेडकर म्हणतात — जात ही भिंत नाही, ती कल्पना आहे. कल्पना तोडणं कठीण असतं — कारण ती आपल्याला दिसत नाही. ती आपल्यातच असते. त्यासाठी मानसिक बदल होणे गरजेचं आहे.

म्हणूनच हे भाषण आज वाचणं महत्त्वाचं आहे. केवळ इतिहास म्हणून नाही — आपण कुठे उभे आहोत हे बघण्यासाठी.

Leave a Reply

Scroll to Top

Discover more from Sandip Palave

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading