मित्र बनून राहण्याचा हट्टही नको करुस…

तुला मी माझं होतानाचं स्वप्न बघितलं होतं
दररोज तुला बघायचं
हातात हात घालून फिरायचं
असे कितीतरी स्वप्न सजवले होते.
त्यात जर तू दुसऱ्या कुणाचीतरी आहेस
बोलताना तू त्याचंच नाव घेतेय
त्याचा हात तुझ्या अंगाला स्पर्श करतोय
मी बघितलेले सर्व स्वप्न आता त्याच्यासोबत जगतेय
आणि त्यात स्वतःला तुझा मित्र म्हणवून घ्यावं लागतंय
हे नाही जमणार गं.
आणि मी तुझ्यासमोर खोटं हसू पण शकत नाही,
कारण चेहरा नाहीतर डोळे,
डोळे नाहीतर शब्द
मन कुठूनतरी वाट शोधीलच व्यक्त होण्यासाठी.
आणि त्रास तो तुला नि मला दोघांनाही होईल.
तुझ्यापासून दूर राहूनही माझं प्रेम निभावेन मी
पण सोबत राहून तुझ्या डोळ्यांत कधीच पाहू शकणार नाही.
निर्णय तुझा आहे, मी त्याचा मान ठेवतो
तेव्हा तूही माझ्या भावनांचा मान ठेव.
आणि
जरी चल, तुझं मान्य केलंही,
पण तुलाही माहितीये खूप प्रेम केलंय मी तुझ्यावर
काय तू ते लपवू शकशील?
सोबत जगलेले ते क्षण, त्या आठवणी
तुला अस्वस्थ करणार नाहीत?
कधी माझ्या नजरेत बघितलंस
तर स्वतःच्या भावनांना अडवू शकशील?
काय तूच
फक्त मित्र म्हणून माझ्याकडे बघू शकशील?
म्हणून तू माझी होऊ शकणार नसेल ना
तर तुझा मित्र बनून राहण्याचा हट्टही नको करुस.

Leave a Comment

Scroll to Top