लेख-४

      जिथपासून मला आठवतंय किंवा जसं मला समजायला लागलंय, अगदी तेव्हापासून मला दोन गोष्टींचं खूपच आकर्षण आहे. त्यात पहिलं म्हणजे ‘व्यक्तिमत्त्व’ आणि दुसरं म्हणजे ‘प्रेम’. आणि कदाचित तसाच माझा स्वभाव बनत गेला. पण जेव्हा मी इतरत्र बघितले तेव्हा मला या दोन गोष्टी सोडून सगळं दिसलं. लोक बाहेरून वाटेल तितकं स्वतःला चांगलं, आकर्षक ठेवतात, पण आतून? प्रश्न पडतो हा माणूसच आहे ना? आणि प्रेम, प्रेमतर कुठंच नाही सापडत. प्रेमाचा अर्थच कुणाला नाही कळला किंवा प्रेमाला सर्वजण घाबरतात. या सर्व गोष्टींनी मला जाणून घ्यायला भाग पाडलं, का कुणी कुणावर प्रेम करत नाही? का लोक स्वतःतल्या माणसाला विसरतात? का प्रेमविवाहही तुटतात. आणि हळूहळू मला याची उत्तरं मिळत गेली.
       कबीर म्हणतात-
     पोथी पढी-पढी जगभूमा पंडित भया नकोय,
     ढाई आखर प्रेम का पढे सो पंडित होय।
        ज्यांनी प्रेमाची अडीच अक्षरे वाचली आहेत, तोच पंडित. जे वाचण्यासाठी पोथी वाचण्याची गरज नाही. जीवनाच्या पोथीमध्येच ते वाचावं लागेल.
       जेव्हा कोणतीही व्यक्ती कुणाच्या प्रेमात पडते, तेव्हा तेथे प्रेमाची अडीच अक्षरे पूर्ण होतात. प्रेम करणारा एक, ज्याच्यावर प्रेम करतो तो दुसरा(दोन) आणि दोघांमध्ये जे काही अज्ञात आहे, ते  अडीच. अडीच म्हणण्याचे कारण- कबीर म्हणतात प्रेम कधीही पूर्ण होत नाही. कितीही पूर्ण झालं असं वाटत असले तरीही! तुम्ही कधीच तृप्त होत नाही. ते ईश्वरासारखे आहे, कितीही विकसित होऊ देत, तरीसुद्धा विकास चालूच राहतो. खरेतर प्रेमाच्या अधुरेपणातच प्रेमाची शाश्वतता आहे.
       प्रत्येकजण प्रेम घेऊनच जन्माला येतो. पण जसजसा तो मोठा व्हायला लागतो, तसतसं त्याला संशय करायला, लबाड व्हायला, स्वार्थी बनायला, सुरक्षित जगायला शिकविले जाते. म्हणजे प्रेम कमी करायला शिकविले जाते. त्याला कारणही तसेच आहे.
      मला जर तुम्ही विचारलं की काय आहे प्रेम? तर मी सांगेन- प्रेम म्हणजे पूर्णपणे समर्पण आणि श्रद्धा. प्रेम म्हणजे स्वतःला पूर्णपणे विसरणे. स्वतःचा अहंकार, गर्व, ‘मी’पण सर्व विसरणे.
         जेव्हा तुम्ही कुणावर प्रेम करता, तेव्हा तुम्ही अशी काही कृत्ये करतात, जी तुम्ही पहिले कधीच केलेले नसतात, जे तुमच्या स्वभावातही बसत नसतात. वागणं बदलायला लागतं. तुम्ही पुन्हा लहान मूल होता, वाकायला शिकतात. सर्व पक्षघात सोडून देतात आणि भितीही. स्वतःला विसरतात, तरीही इतके आनंदी असतात, की जसं सर्वकाही मिळालं, आता कसलीच अपेक्षा नाही. इतके आनंदी जितके पहिले कधीच नव्हते.
         प्रेम पूर्ण समर्पण मागतं, स्वतःला विसरायला भाग पाडतं. आणि हेच कारण आहे ज्यामुळे लोक प्रेम करायला घाबरतात, प्रेमाला विरोध करतात. कारण प्रेमामध्ये फक्त समोरचाच जिंवत असतो, आपण नसतोच. आणि म्हणूनच प्रेमात पडलेल्या व्यक्तीला वेडं म्हटलं जातं. कारण तो जगाच्या कल्पना, विचार, अपेक्षांपेक्षा वेगळाच वागायला लागतो. जगाची पर्वाच उरत नाही त्याला, जणू.
       प्रेम कधीच पूर्ण होत नाही, ते वाढतच असतं. म्हणून येशु म्हणतात- प्रेमच ईश्वर आहे. भलेही तुम्ही प्रेम एका व्यक्तिवर करा, पण नकळत त्यावेळेस तुम्ही पूर्ण जगाशी जोडले गेलेले असतात. सगळीकडे मित्रच मित्र दिसायला लागतात. आतातर क्वांटम फिजिक्ससुद्धा सांगतंय, पूर्ण विश्व जोडलं गेलंय आणि ते जोडणारा जो एक धागा आहे तो धागा म्हणजेच ‘प्रेम’. प्रेमाने पूर्ण विश्व जोडलं गेलंय.
          पण, प्रेम कुणाला कळतच नाही किंवा कोणी जाणूनच घेत नाही. सगळे स्वतःच्या स्वार्थासाठी प्रेम करतात. अपेक्षा असतात, म्हणून प्रेम करतात. आणि एकदा समोरच्याकडून मिळणं बंद झालं, किंवा अपेक्षा पूर्ण झाल्या की ते वेगळे होतात. बहुतेकांना वाटतं प्रेम हे फक्त रसायनांमुळेच होते. हे खरं आहे की प्रेमात पडल्यावर शरीरात रसायनं स्रवतात. testosterone, estrogen, dopamine, oxytocin, and vasopressin इ.. जे आपल्याला जोडीदारासोबत वेळ घालवण्यास भाग पाडतात, आनंद देतात, जोडीदाराच्या चूका विसरायला, टाळायला सांगतात, जोडीदारासाठी काहीही करण्याची टाकत देतात, भीती घालवतात. पण जवळपास दोन वर्षांनी या रसायनांचा परिणाम कमी व्हायला लागतो आणि कालांतराने नाहिसा होतो. अशावेळेस काही नाती(Relationships) कोलमडायला लागतात, तर काहींची नाती जीवनभर टिकतात. ज्यांचे टिकते त्यांना एकदुसऱ्यांची सवय झालेली असते, ते फक्त रसायनांमुळेच एकत्र आलेले नसतात. त्यांना एकमेकांशिवाय जीवनाची कल्पनाही करवत नाही. आणि तेच असतं ‘deep love’. ज्याला आपण जन्मोजन्मीचं प्रेम म्हणतो.
       खरंतर प्रेम जशी भावना आहे, तसंच ते क्रियापदही आहे. म्हणजे ‘Act of doing’. आपल्या प्रेमीकरिता, त्याला आनंद देईल, त्याच्याकरिता योग्य असं काहीही करण्याची क्रिया. जे बहुतेकांना समजतच नाही. ते प्रेमाला फक्त भावना समजतात आणि ते अनुभवतात. प्रेमात समोरच्याला ‘देणं’ असतं(भलेही तो अपेक्षा नसेल करत तरीही), हेच कुणाला माहीत नसतं. आणि म्हणून नाती तुटतात.
         मी कल्पना करतो, जर पूर्ण जगात प्रेमच प्रेम असेल तर, जग किती सुंदर होईल ना? माणूस दगड न होता, फुलच होईन. दगड जो सुरक्षित असतो, पण मेलेला, निर्जीव असतो. तर फुल ज्याला धोका असतो पण ते जिवंत असतं. प्रेमच आहे जे माणसाला किंवा प्राण्यालाही जिंवत ठेवते. कुणास ठाऊक हे जग जिवंत केव्हा होईन? लोक प्रेम करायला कधी शिकतील? लोक शिकतील तेव्हा शिकतील, मी तर शिकलोय. आणि शक्य तिथे शिकवेनही.

  टिप: वरती सांगितलेलं तुम्हाला सैद्धांतिक (theoretical) वाटेल, तुम्ही म्हणू शकतात की हे वास्तवात(practical) नाही येऊ शकत. तर तुम्हाला सांगावंसं वाटतं, हे होतं. जे प्रेम करतात त्यांना विचारा. माझ्या माहितीत असे लोक आहे, ज्यांनी हे अनुभवलेलं आहे. म्हणून हे वास्तव आहे, त्यासाठी तुम्हाला फक्त ‘मी’पणा सोडणं गरजेचं आहे. मग तुम्हाला प्रेमच प्रेम, आनंदच आनंद भेटेल…
        
         

1 thought on “लेख-४”

Leave a Comment

Scroll to Top