एक पत्र… आपल्या नात्यासाठी

अय वेडी,

ऐक ना, आज ना अगदी मनापासून काहीतरी सांगायचं आहे तुला. नाही नाही, दरवेळेससारखं रोमँटिक, प्रेमाच्याच गोष्टी नाही करणार. Flirting नाही करणार आज. ते तर मी दररोजच करतो. आज काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत, ज्या खूप गरजेच्या वाटतात मला. आपण आता एक नवीन नात्याची, नवीन प्रवासाची सुरुवात करतोय. असं नाही की आपण एकमेकांना ओळखत नाही, ओळखतो. पण माणूस जसजसा पुढे जात राहतो, एक एक पायरी चढत जातो तसंतसं त्याला बदलत राहावं लागतं. त्यानुसार त्याच्या वागण्यातही बदल होत जातोच ना? आज आपण जसे आहोत तसेच उद्या नाही राहणार, दोघेही बदलत जाऊ.

बऱ्याचदा असंही होईल की आपल्याला एकमेकांच्या काही गोष्टी, वागणं पटणार नाही. आवडणार नाही. भांडणही होतील बऱ्याचदा. चिडू आपण एकमेकांवर. पण एक लक्षात ठेव, आपण ते भांडणं कधीच टाळणार नाही. भांडू, पण जेव्हा आपल्यालाच कळेल ना की आपण चुकतोय त्यावेळी स्वतःचा ego बाजूला करून ते स्वीकारुही, जसं आपण आजपर्यंत करत आलो. कारण आपलं भांडण एकमेकांसोबत नाही, तर त्या problem सोबत असणार आहे. जेव्हा आपल्यातला कोणी एक हारेल ना, आपण दोघेही हरू. पण जेव्हा तो problem हारेल, तेव्हा आपण दोघेही जिंकू. लक्षात राहू दे, आपण एक team आहोत. अम्?

आपण आता एकमेकांचे शिक्षक आणि विद्यार्थी आहोत. तू मला काही गोष्टी शिकव, माझ्याकडुन तू काही शिकशील. नाही नाही, आपण वर्ग वगैरे नाही भरवणार. जगता जगताच आपण शिकत अन् शिकवत जाऊ. कारण, माणूस म्हणून आणि काही गोष्टींवर प्रयोग करताना, जगताना आपण खूप चुका करत जाणार आहोत. त्यातूनच माणूस शिकतो आणि प्रगती करत जातो ना? त्यामुळे तुला कधीतरी असंही वाटू शकतं ‘हा असा विचित्र का वागतोय?’ कधी मलाही तुझ्याबद्दल तसं वाटू शकतं. पण त्याच गोष्टी आपल्या नात्याला नावीन्य देत राहील आणि त्याला टवटवीत ठेवीत जाईल.आपण नात्यात एवढी मोकळीक ठेवली आहे ना की आपल्याकडून जर अशी एखादी (समजा) चूक झालीच ज्यामुळे असं वाटेल की आपलं नातं खराब होईल, तर तेसुद्धा आपण एकमेकांना सांगत जाऊ. मी तुला जवळ घेईन, तुझा हात हातात घेईन, तुला मिठीत घेईन, तुला रडूही देईन पण तुला एकटीला नाही सोडणार. कारण तू प्रामाणिकपणा दाखवतीय. आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर, कितीही वाईट परिस्थिती असली तरी तुला एकटीला कधीच नाही सोडणार मी, हा विश्वास ठेव. एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या गोष्टी आपलं नातं खराब करू शकतात असं आपल्याला वाटतं ना, त्यांना face करायला शिकायचं. त्याच आपलं नातं अजून strong बनवत नेतील. आणि आपल्या नात्यात तो विश्वास, प्रामाणिकपणा, आणि मोकळेपणा आहे ना? फक्त कधी घाबरु नकोस.

यार, एक गोष्ट मला तुझी खुप आवडते – तुझा उत्साह. तुझी काही स्वप्न आहेत, तुझ्याही इच्छा आहेत काही. माहित आहे मला. आणि तुला ते पूर्ण करायचे आहेत, हि खूप attractive गोष्ट आहे. मी तुला साथ देईन त्यामध्ये, जसा आजपर्यंत दिला तसाच. लोक settled partner शोधतात. आपण काहीच नव्हतो तेव्हापासून सोबत आहोत, आणि एकमेकांच्या सोबतीने, समजूतदारीने बघ आपण बऱ्याच गोष्टी मिळवल्याही. जेव्हा दोन लोक सोबत काम करतात, शिकतात, अडचणी face करत प्रगती करतात तेव्हा त्या दोघांमधलं नातं खूप strong होत जातं.

आपण एकमेकांना कधीच control करण्याचा; आपले विचार, स्वप्न दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न नाही केला. आपण कायम एक healthy communication ठेवलं, वेळ दिला, आणि गरज पडली तेव्हा विरोधही केला ना? पण त्याचा आपल्या नात्यावर कधीच परिणाम नाही झाला. कारण आपला विरोध किंवा नापसंती व्यक्तीला नसून त्या विचारला असायची, आणि आपण हे समजून घ्यायचो. भारिय ना हे?

जसं आपलं अगोदरही बोलणं झालं, तुझी पहीली priority कायम तू स्वतः असणार आहेस, मी नाही. कारण जी व्यक्ती स्वतः आनंदी नाही राहू शकत, स्वतः fulfill आणि satisfied नाही राहणार ती दुसऱ्याला आनंद कसा देणार? तुला तर माहिती आहे ना की आपण दुसऱ्याकडून आपल्याला आनंदी ठेवण्याची, आपल्या emotional needs पूर्ण करण्याची अपेक्षा ठेवली तर नातं कसं खराब होतं. आपल्या गोष्टी आपल्यालाच कराव्या लागतात, दुसरा फक्त मदत करू शकतो. आणि मी कायम तिथे असेन.

बऱ्याचदा आपण भांडलोय. आठवतंय कितीदा आपण वेगळं होण्याच्याही गोष्टी केल्यात. पण नाही होऊ शकलो. आपण व्यक्ती म्हणून परिपूर्ण होण्याचा प्रयत्न केला. असं नाही बोलत बसलो की प्रेम आहे म्हणजे आपल्याला काही कष्ट नाही करावे लागणार, आपोआप सगळं होत जाईल. तर आपण स्वतःवर आणि आपल्या नात्यावर काम केलं. त्यामुळे एकटं पडण्याची भीतीच उरली नाही आपल्यात. त्यावेळेस आपलं नातं खरं प्रेमाने बांधलं गेलं, जिथं आपण खऱ्याअर्थाने एकमेकांना देऊ लागलो.

खरंच यार, खूप शिकलो अन् घडलो यामध्ये. आणि आनंद याचा वाटतो की सोबत घडत चाललोय. कारण मी एकटा हे करूच शकलो नसतो, तुझी साथ होती म्हणूनच हे नातं इतकं बळकट झालं आहे. तू सोबत राहिली म्हणूनच अवघडातल्या अवघड परिस्थितीमध्येही लढण्याची ताकद मिळाली. बरेच couples इथेच fail होतात. पण आपण केलं. आणि आता अजून खूप काही करायचं, शिकायचं, आणि बघायचं आहे. तर काय म्हणतेस, करायची प्रवासाला सुरुवात?
चल मग…

तुझा,
वेडा

Leave a Comment

Scroll to Top