‘तू स्वतःला कसं सावरलं?’
‘तिला कसं विसरू शकला?’
या प्रश्नांना उत्तर फक्त एकच आहे –
मी तिला विसरलेलो नाही, आणि कधी विसरेल याची खात्रीही नाही.
स्वतःला सावरलं, कारण मी विचार केला कि माझ्या प्रत्येक अवघड क्षणी ती माझ्यासोबत नव्हती. तिची गरज असताना ती हात सोडून द्यायची, मग जर मी उद्या स्वतःच्या पायावर उभा राहिलो, आणि समाजाने आमच्या नात्याला मान्य केलं नि तेव्हाच जर ती मला ‘हो’ म्हणणार असेल तर काय फायदा या नात्याचा?
इतरांची मंजुरी असेल तरच ती सोबत, नाहीतर नाही.. नकोय मला असं नातं.
आणि जर मला तिच्यामुळे त्रास होतोय या विचारांनी जर तिला त्रास होत असेल, तर तिला त्रास न होऊ देणं हे माझं कर्तव्य नाही का? नाही म्हटलं तरी प्रेम केलंय तिच्यावर..
‘प्रेम निभावता आलं नाही तिला’, असंही नाही म्हणू शकत. कारण तिने माझ्यावर कधी प्रेम केलंच नाही, तर ते निभावता आलं की नाही हा प्रश्न येईलच कसा?
हजार वेळा सांगितलं की माझं तिच्यावर किती प्रेम आहे ते, तरी तिला कळलं नसेल, तर मग काय फायदा? खरंतर मी तिला हे सांगण्याची गरज नसायला हवी होती. माझ्या आवाजात, माझ्यात डोळ्यांत, माझ्या काळजीत, माझ्या वागण्यात तिला ते कळायला हवं होतं. पण नाही कळलं, कदाचित..
जर माझ्यापासून दूर जाऊन तिला आनंद मिळत असेल, तर मग तिला मुक्त नको का करायला?
मी स्वतःला समजवलं, जर तिने ठरवूनच टाकलं असेल की माझ्या आयुष्यातून दूर जायचं, तर मी कितीही आठवण काढत बसलो, विचार करत बसलो, वाट पाहिली, plans केले तरी ती परत थोडी ना येणार आहे?
असं नाही की तिची आठवण येत नाही, येते, खूप येते. मन अस्वस्थही खूप होतं, अश्रूही दाटून येतात (फक्त दाटून येतात, बाहेर नाही येत), पण स्वतःला पुन्हा समजून सांगतो नि कामाला लागतो. दुसरा पर्यायच नाहीये…