लेख-६

जर माझा मानसशास्त्राचा अभ्यास असेल तर मी निराशा, ताणतणाव, आत्महत्त्या यांवर लेख का नाही लिहिला? असा प्रश्न मला विचारला गेला. त्याचं कारण- माझ्या मनात काही प्रश्न गोंधळ घालत होते, आणि ते होते- जर आज इंटरनेटवर इतके प्रचंड लेख आहेत, युट्युबवरती व्हिडिओज आहेत तसंच प्रत्येक ग्रंथालयात कप्पेच्या कप्पे भरून असली पुस्तकंही आहेत आणि विशेष म्हणजे लोक ते वाचतात, व्हिडिओज बघतात, तरीही इतकी निराशा का? आत्महत्येचं प्रमाण कमी होण्याऐवजी वाढतंय का? असे हे प्रश्न.
           मला यांची उत्तरं मिळाली. आज दिखाऊपणा, स्पर्धा, मालकीहक्काची भावना खूप वाढलीय. माणूस स्वतः काही असण्यापेक्षा, माझ्याकडे इतकं इतकं आहे यातच आनंद मानतो. तोही तात्पुरता. त्यात दिखाऊपणा आणि भर म्हणून मदतीला आले ते समाजमाध्यमं. आज तरुण-तरुणी instagram, facebook, tik-tok अजून अन्य, यांवर जास्त मित्र, followers मिळविण्याचा प्रयत्न करतात. त्यांना सतत भीती वाटते की कोणी मला नाकारू नये, जिथं मी उभा असेन तिथं सगळ्यांचं लक्ष जावं. त्याकरिता दुसऱ्यांना आकर्षित करण्याचा मग प्रयत्न होतो. त्यासाठी महागडे कपडे, गाड्या, घरं, महागड्या वस्तू यांची खरेदी वाढायला लागली. त्यात भर म्हणून हे सिनेमे किंवा अन्य व्हिडिओज आणि काही महत्त्वाकांक्षा वाढविणारे पुस्तकं. लोक त्यामुळे अस्वस्थ, असुरक्षित व्हायला लागले, एकाकी पडायला लागले. कितीतरी कुटुंब या नादात विभक्त झालेत.
           शिक्षणसुद्धा शिकण्यापेक्षा दिखाऊपणा, एक व्यवसाय बनलाय. मोठं कॉलेज, चांगल्या पगाराची नोकरी आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या कॉलेज किंवा कंपनीतील पदामुळे वाढणारं status, यामागे सगळे पळायला लागलेत. म्हणून स्पर्धा सुरू झाली.९२%, ९५% मार्कांशिवाय प्रवेश मिळणं कठीण होऊन बसलं. परीक्षेत चांगले गुण मिळविण्याकरिता स्पर्धा, प्रचंड धडपड, त्यातून तयार होणारा तणाव हे सगळं सुरु झालं. ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही त्यांना असुरक्षित वाटायला लागलं. त्यातही मुला-मुलींच्या अपेक्षा, त्यांच्याकडून पालकांच्या अपेक्षा वेगळ्याच. म्हणून अजूनच तणाव वाढायला लागला. तो सहन न झाल्याने काही चुकीच्या वळणावर जातात, काही गुन्हेगार होतात, त्यातही परत अपराधीपणाची भावना, आणि काही सरळ आयुष्यच संपवितात. दर वर्षी हजारो मुलं आत्महत्त्या करतात. भारतात २००६ मध्ये दिवसाला १६ मुलांनी आत्महत्या केल्या तर २०१८ मध्ये तेच प्रमाण दिवसाला २८ झालं. हे तर शाळा-कॉलेजच्या मुलामुलींचं प्रमाण झालं. शेतकरी, बेकारीमुळे, अजून काही कारणांनी आत्महत्या करणारे वेगळेच. ‘वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन’च्या एका अहवालानुसार दरवर्षी आत्महत्त्येमुळे मरणाऱ्या लोकांचं प्रमाण हे ४० सेकंदाला एक असं आहे.
            म्हणून मला याची कारणं समजून घ्यायची होती. आणि याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ‘चंगळवाद’ आणि त्याला प्रोत्साहीत करणारे व स्वतः नफा कमाविणारे काही लोक. माझं पहिलेही हे मत होतं आणि आता तर ते दृढ बनतंय की राजकारण आणि उद्योग(businesses), म्हणजेच राजकारणी आणि उद्योजक हे जगाचा पार चेहरा मोहराच बदलून टाकू शकतात. त्यांना पाहिजे तसं ते लोकांचं ब्रेनवॉशिंग करू शकतात. लोकांना स्वतःकडे आकर्षित कसं करून घ्यायचं आणि वेडं कसं बनवायचं हे त्यांना चांगलं कळतं. आणि मग लोकांचा ग्राहक बरोबर होतो.
            माझं अजून एक मत आहे- तुम्ही कितीही प्रयत्न करा लोकांना सांगण्याचा, शिकविण्याचा, तत्वज्ञान पाजण्याचा, कितीही मोहिमा काढा, संस्था उभारा पण हे सर्व लोकांना आनंदी नाही बनवू शकत. कारण त्यांच्यावर हावी असणारा हा चंगळवाद, ब्रेनवॉशिंग करणाऱ्या जाहिराती, संस्था इथे आहेत. त्यात मग राजकारण, उद्योजक, शिक्षणव्यवस्था, समाजव्यवस्था, असल्या अनेक ‘व्यवस्था’ आहेतच. त्यांनी लोकांचं आयुष्य पूर्णपणे व्यापून टाकलंय. प्रत्येकजण झटतोय ते जाहिरातींमध्ये दाखविलेल्या वस्तू-सेवा घेण्यासाठी, व्यवस्थेत सहभागी होण्यासाठी, पदासाठी, status साठी. कारण हे जग दिखाऊपणावर आणि माणूस कल्पनेवर जगतोय.
           तरीही मला वाटतं, असं जाहिरातबाजी, बोलीबच्चनवर भाळण्यापेक्षा, status पेक्षा आपली गरज काय आहे याचा विचार करावा. महात्मा गांधीजी म्हणतात ना, ‘जगाकडे प्रत्येकाच्या गरजेसाठी पुरेसे आहे, पण प्रत्येकाच्या लालसेइतके पुरेसे नाही’. म्हणून विनाकारण शोबाजी करण्यापेक्षा गरज असेल त्याचा विचार का नको करायला? आयुष्य समृद्ध का नको बनवायला?  To have पेक्षा to be चा हट्ट का नको धरायला? लोकांसोबत समभावाने, सामिलकीने, एकत्र का नको राहायला? विचार करा…

Leave a Comment

Scroll to Top